जळगाव I प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसीय पारंपरिक खेळांचे आयोजन दिनांक 17 व 18 सप्टेंबर वार शुक्रवार व शनिवार रोजी करण्यात आले होते.शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील,समन्वयिका सौ वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत पारंपरिक खेळांचे उदघाटन करण्यात आले.
पारंपरिक खेळात सागरगोट्या,विटी – दांडू,टायर फिरवणे,दोरीवरच्या उद्या,लगोरी,झोका,भोवरे फिरवणे,लंगडी,धावणे,बेडूक उद्या,अशा अनेक खेळांचा समावेश होता.हे पारंपरिक खेळ विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन खेळले व पारंपरिक खेळाचा अनुभव घेतला या प्रसंगी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.प्रत्येक खेळाचे प्रमुख विद्यार्थ्यांना खेळ शिकवत होते आणि खेळवत होते याप्रसंगी पालकांची उपस्थिती ही होती
आज हे सर्व पारंपरिक खेळ आपण विसरलो आहोत. अशा प्रकारचे अगदी महाराष्ट्रातल्या भूमीतले काही खेळ होते हे आज सांगितले तर अनेकांना आश्चर्यच वाटेल.आपली जीवनसरणी बदलली आणि आपण हे खेळ खेळायचे थांबलो. फारसे काही साहित्य न लागणार्या अशा या खेळांमधून उत्तम व्यायाम तर होतोच पण आपल्यातले उपजत कला-कौशल्य पणाला लागते. सध्याच्या मोबाइल आणि कॉम्प्युटर ‘गेम्स’ च्या युगात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन खेळायला अनन्यसाधारण महत्व आहे.तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दुसरी बाजू ही की विद्यार्थ्यांमधील तुटत चालेला संवाद… या खेळांमुळे रोजच्या कामांमधून वेळ काढून विद्यार्थी एकत्र येतात, खेळतात, करमणूक होते, संवाद वाढतो आणि मन प्रसन्न राहते. आपल्या संस्कृतीची आठवण म्हणून आपण येत्या पिढीला हे खेळ शिकवायला हवे.या साठी विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघनगर येथे दोन दिवसीय पारंपरिक खेळाचे आयोजन केले होते.या खेळाचे नियोजन सौ भाग्यश्री वारूडकर,श्री सचिन गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.समन्वयिका सौ वैशाली पाटील,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याचे सहकार्य लाभले.