मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री दीपाली सय्यद वारंवार त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात परंतु यावेळी त्यांच्यावर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी सय्यद यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप केले आहेत.
त्याचबरोबर दीपाली सय्यद ट्रस्टतर्फे होणारे व्यवहार चुकीचे आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. शिंदे यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तर भाऊसाहेब शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार दिले होते. पुरस्कारामध्ये यावेळी ५० लोकांना ५० हजारांचे धनादेश देण्यात आले होते. पुरस्कारात देण्यात आलेले चेक बनावट असल्याचाही आरोप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ७०० ते ८०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून हा पैसा चुकीच्या मार्गाने आला असून याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबत संबंध असून याचे सर्व पुरावे देऊ असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंग यांची भेट घेऊन दीपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट रचला होता. अयोध्या दौ-यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद प्रोत्साहित करत होत्या, यासाठी त्यांना एका मोठ्या नेत्याचा पाठिंबा होता, असा आरोपही त्यांच्यावर शिंदे यांनी केला आहे.