मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. तर काही भागात सोशल मिडीयावरील सुरु असलेल्या हालचाली लहानमुले जवळून पाहत असल्याने ते त्याच गोष्टी करू लागल्याने पालकांचे टेन्शन वाढत आहे. तसेच लहान मुलांसह प्रौढांनाही मोबाइलचे व्यसन लागले असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मोबाइलच्या वाढत्या व्यसनाच्या दुष्परिणामाबद्दल अनेकदा चर्चा होतात. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. अशीच एक दुर्देवी घटना समोर आली आहे. मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्यास मनाई केल्याने एका 10 वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही दुर्देवी घटना, उत्तर प्रदेशच्या लखनौमधील हुसैनगंजमधील चितवापूर परिसरात घडली. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून या मुलाने शाळेत जाणे बंद केले होते. शाळेत न जाता दिवसभर मोबाइलवर गेम खेळत असे. त्याला घरातल्या लोकांनी मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्याने कोणाचेही ऐकले नाही. सोमवारी रात्री क मोबाइलवर गेम खेळण्यावर त्याच्या आईने दम दिला आणि त्याच्या हातातून मोबाइल हिसकावून घेतला.
आईने दम देत मोबइल हिसकावून घेतल्याने 10 वर्षीय मुलाने आपल्या खोलीतून बहिणीला बाहेर काढले आणि दरवाजा बंद केला. काही वेळानंतर घरातील सदस्यांनी, नातेवाईकांनी त्याला दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. मात्र, खोलीतून कोणताही प्रतिसाद आला नाही. बराच वेळ होऊनही कोणताच प्रतिसाद न आल्याने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी नातेवाईकांना त्या लहान मुलाने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. या घटनेने सगळ्यांना धक्का बसला. या घटनेची माहिती पोलिसांना तातडीने देण्यात आली. सेंट्रल झोनच्या पोलीस उपायुक्त अपर्णा रजत यांनी सांगितले की या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. पोलिसांनी अद्याप मृत बालकाच्या आईचा जबाब नोंदवला नाही.