औरंगाबाद : वृत्तसंस्था
राज्यात सुरु असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत विभाग नेहमी प्रयत्नशील असतांना दिसून येत असते पण त्यांच्याही डोळ्यावर धूळफेक करीत शासकीय कर्मचारी लाचेची मागणी करीत असतात, असेच एक प्रकरण उजेडात आले आहे.
औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्याने लाच मागितली होती. तर लाचेच्या मागणीसोबतच जेवणासाठी दोन हजारांची लाच मागितली असता तडजोड अंती ‘फोन पे’वरून १५०० रुपये घेतांना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विजय पवार (पोलीस नाईक ब.न. 450, नेमणूक बिडकीन पोलीस स्टेशन, औरंगाबाद ग्रामीण) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर यासाठी मध्यस्थी करणारा डोंगरूनाईक तांडा गावाचा पोलीस पाटील गुलाब छगन चव्हाण विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचे विरुद्ध बिडकीन पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या गुन्ह्यात फिर्यादी यांना मॅनेज करणे व गुन्ह्यात मदत मिळवून देण्यासाठी पवार याने 80 हजार लाचेची मागणी केली होती. दरम्यान 50 हजार रुपये तडजोडी अंती पंच साक्षीदार समक्ष लाचेची त्याने मागणी केल्याचं स्पष्ट झाले होते. त्यानंतर जेवणासाठी देखील आणखी दोन हजार रुपये मागितले असता, फोन पे वरून तडजोडी अंती १५०० ची लाचेची मागणी पंच साक्षीदार समक्ष केली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.