नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे. सिक्कीमच्या जेमा येथे शुक्रवारी लष्कराचा ट्रक दरीत कोसळला. यामध्ये 16 जवान शहीद झाले असून 4 जखमी झाले आहेत. एका तीव्र वळणावर वाहन घसरले आणि थेट दरीत कोसळल्याचे लष्कराने सांगितले. या वाहनासोबत लष्कराची आणखी दोन वाहने होती. तिन्ही वाहने सकाळी चट्टण येथून थंगूकडे जात होती. लष्कराचे बचाव पथक हेलिकॉप्टरद्वारे मृतदेह आणि जखमी जवानांना बाहेर काढत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून जखमी लवकरात लवकर बरे होण्याची कामना केली आहे. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूमुळे खूप दुःख झाले. त्यांच्या सेवा आणि वचनबद्धतेबद्दल देश त्यांचा कृतज्ञ आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना. जखमी जवान लवकरात लवकर बरे होण्याची कामना करतो.