जळगाव : प्रतिनिधी
जुन्या वादातून आकाश उर्फ धडकन सपकाळे याच्या खूनातील दुसऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री आसोदा गावातील जंगलातून बेड्या ठोकल्या आहेत. नरेंद्र उर्फ भद्रा पंडित सोनवणे (३१, रा. आसोदा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याला पुढील कार्यवाहीसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मंगळवारी सायंकाळी जुन्या वादातून जुने बसस्थानक परिसरामध्ये आकाश सपकाळे याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या रात्रीच मुख्य संशयित गोपाल सैंदाणे याला पोलिसांना अटक केली असून तो सध्य २३ पर्यंत पोलिस कोठडीत आहे.
दुसरा संशयित नरेंद्र सोनवणे हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. दोन दिवसांपासून पोलिस त्याच्या शोधार्थ होती. जळगाव येथून तो भुसावळ येथे गेला. नंतर बऱ्हाणपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, त्याठिकाणी पोलिसांना तो मिळून आला नाही. अखेर बुधवारी रात्री तो आसोदा गावात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी तत्काळ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, जितेंद्र पाटील, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राहूल पाटील, सचिन महाजन यांचे पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने बुधवारी मध्यरात्री आसोदा गावाच्या जंगलातून नरेंद्र याला अटक केली. त्यानंतर गुरूवारी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.