पुणे : वृत्तसंस्था
क्षुल्लक कारणावरून काहीवेळा मोठा गुन्हा घडत असतो. असाच काहीसा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर ही घटना घडली आहे. सिंहगड रस्त्यावर असलेल्या फुलपरी स्वीट मॉलमध्ये तरुणाने गोळीबार केला आहे. गोळीबार करण्यामागील कारणही गमतीशीर आहे. एक किलो काजू कतली फुकट दिली नाही म्हणून गोळीबार केल्याची बाब समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काजू कतलीसाठी गोळीबार केल्यानं पुण्यात खळबळ उडाली सिंहगड पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. वडगाव बुद्रुक परिसरात ही घटना घडल्याने या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक परिसरातील फुलपरी स्वीट मॉलमध्ये तरुण-तरुणी काजू कतली घेण्यासाठी आले होते. एक किलो काजू कतली हवी म्हणून त्यांनी सांगितले, दुकानदाराने एक किलो काजू कतली पॅक केली, पैसे मागितले तेव्हा पैसे देण्यास नकार देत थेट बंदूक काढली आणि गोळीबार केला. दुकानदाराने सुरुवातीला खेळणीतील बंदूक असावी म्हणून दुर्लक्ष केलं पण दुकानातील बंदुकीची गोळी पाहून गोळी खरी असल्याचे लक्षात आल्याने दुकानदाराने थेट पोलीस ठाणेच गाठलं. दुकानदारांच्या संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी याबाबत पोलिसांत धाव घेत कारवाईची मागणी केली होती, त्यात चौकशी करून सीसीटीव्हीचा आधार घेत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तरुण आणि तरुणीला ताब्यात घेण्यात आले असून काजू कतलीसाठी गोळीबार केल्याची कबुली त्यांनी दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.