मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यात तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. आता धक्कादायक निकाल हाती येऊ लागले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजीराजेंनी महाराष्ट्रात वेळोवेळी आंदोलनं केली. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेतून राजकीय आखाड्यात नशीब आजमावून पाहण्याची तयारी सुरू केलीये. या स्वराज्य संघटनेनं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जोरदार मुसंडी मारलीये.
ग्रामपंचायत निवडणुकीत स्वराज्य संघटनेनं विजय मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाच्या माध्यमातून स्वराज्य संघटना जोरदार कामगिरी करेल, असा विश्वास स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी व्यक्त केलाय. स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी घोडदौड सुरू आहे. धाराशिव येथील सरपंचासह 13 सदस्य निवडून आले आहेत. तर, नाशिकमध्ये सरपंचासह सदस्यपदी कार्यकर्ते निवडून आले आहेत. आतापर्यंतच्या निकालानुसार स्वराज्य संघटनेच्या 3 ग्रामपंचायत विजयी झाल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशगाव व वासोल गाव तसंच धाराशिव जिल्ह्यातील तडवला ग्रामपंचायतींचा समावेश आहे.