मुंबई : वृत्तसंस्था
महाविकास आघाडी सरकारचा मोर्चा सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. यापुढे गावा-गावात केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली.
महाविकास आघाडीच्या मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, आजच्या महामोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना डिसमिस केले आहे. या मोर्चाने इशारा दिला आहे की, शिंदे-फडणीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना पाहणार नाही. या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकणार नाही. हे सरकार उलथवून टाकू.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आज हिंदू संघटनांनी ठाणे बंद पुकारला आहे. त्याला भाजप व शिंदे गटानेही पाठिंबा दिला आहे. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनीच आपले शहर बंद करण्याचा हा प्रकार मी प्रथमच पाहत आहे. यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे, तो नुसता वळवळत असतो. तुम्ही राज्यकर्ते आहात. विचाराला विचारांनी विरोध केला पाहीजे. आपलेच शहर काय बंद करताय?
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात ते ठाणेच ते बंद करत आहे. खरतर त्यांची ऐवढीच ऐपत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचे शहर बंद करण्याचा आदेश देताय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत बसताय. हे लाचार सरकार आहे. आजच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाबद्दल संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाविरोधात खरे तर महाराष्ट्र बंद करायला हवा. पण, आज आम्ही मोर्चा काढून आमचा निषेध नोंदवत आहोत. हा मोर्चा भव्यदिव्य असा होणार आहे. पण, या महाराष्ट्र प्रेमींच्या मोर्चालाच सरकारने जाचक अटी लादल्या आहेत.