मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप नेते व राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला आता सुरुवात झाली असून आज पहिल्यांदा लाल, भगवं, हिरवं, निळं तुफान धडकलं आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्च्याला सुरुवात झाली आहे. भायखळा येथून हा मोर्चा निघाला आहे. स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, चिरंजीव आदित्य ठाकरे या मोर्चात सामील झाले असून पायी चालत आझाद मैदानाकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही पायी चालत निघाले आहेत. या मोर्चात हजारो लोक एकवटले असून बघावं तिकडं लोकच लोक दिसत आहेत.
या महामोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्राने कधीच पाहिलं नव्हतं असं चित्रं दिसून आलं आहे. या मोर्चात पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माकपा, रिपाइं (दीपक निकाळजे गट), रिपाइं (खरात गट) आणि डाव्या विचारांच्या इतर संघटनांसह आंबेडकरी संघटनाही सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे परस्परविरोधी विचारांचे नेते असूनही सर्वजण एकत्रित मोर्चात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडताना दिसत आहे.
भायखळ्याच्या क्रुडास कंपनीच्या परिसरातून हा मोर्चा सुरू झाला. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले आहेत. प्रत्येकाच्या हातात झेंडे आहेत. कुणाच्या हातात निळा झेंडा आहे. कुणाच्या हातात भगवा झेंडा आहे, कुणाच्या हातात लाल, हिरवा, पिवळा तर कुणाच्या हातात तिरंगा झेंडा आहे. कुणाच्या डोक्यावर निळ्या आणि भगव्या टोप्या आहेत. तर कुणाच्या गळ्यात भगवे आणि निळे शेले आहेत. तर कुणाच्या हातात सरकारचा निषेध करणारी फलकं आहेत.
अति विराट प्रमाणात हा मोर्चा निघाला आहे. घोषणा देत देत लोक निघाले आहेत. राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत. राज्यपालांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत. तर महापुरुषांचा जयजयकारही करण्यात येत आहे. स्वत: आदित्य ठाकरेही घोषणा देत आहेत. प्रत्येकजण पायी चालत आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, अबू असीम आजमी, चंद्रकांत खैरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, भाई जगताप, विनायक राऊत, सुभाष देसाई, छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, माणिकराव ठाकरे आदी नेते पायी चालत आहेत. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही पायी चालत आहे. या महामोर्चात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत. आदिवासी जिल्ह्यातील लोक या मोर्चात मोठ्या प्रमाणार दिसत आहेत. कष्टकरी आणि कामकरी या मोर्चात मोठ्या संख्येने दिसत आहेत. हा मोर्चा सुरू झाला तेव्हा एका मुस्लिम कुटुंबाने आपल्या घराच्या गॅलरीतून मोर्चेकऱ्यांवर ओंजळ भरून भरून फुलांची उधळण केली.