अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट वादात सापडला आहे. अयोध्य्याचे महंत राजू दास यांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. इतकंच नव्हे तर त्यांनी म्हटलंय, “मी प्रेक्षकांना विनंती करतो की ज्या थिएटरमध्ये पठाणचा चित्रपट दाखवला जाईल, त्याला जाळून टाका.” राजू दास यांनी बॉलिवूड आणि शाहरुखवर सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप केला.
“बॉलिवूड आणि हॉलिवूड सतत या प्रयत्नात असतात की कशा पद्धतीने सनातन धर्माची मस्करी करावी, कशा प्रकारे हिंदू देवी-देवतांचा अपमान करावा. पठाण चित्रपटात दीपिका पदुकोणने बिकीनी घालून साधुसंतांच्या आणि राष्ट्राच्या भगव्या रंगाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. हे दु:खद आहे”, असं अयोध्याचे महंत राजू दास म्हणाले. “भगव्या रंगाची बिकिनी घालून नग्न प्रदर्शन करायची काय गरज होती? अशा लोकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकावा आणि ज्या थिएटरमध्ये तो चित्रपट दाखवला जाईल, त्याला जाळून टाकावं. जशास तसं उत्तर दिलं पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला.
शाहरुखचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. त्यातील एका सीनमध्ये दीपिका पदुकोण ही केसरी रंगाच्या बिकिनीत पहायला मिळते. यावरूनच हिंदू संघटनांकडून संताप व्यक्त होतोय. हिंदू महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनीसुद्धा यावर आक्षेप नोंदविला. पठाणमध्ये भगव्या रंगाचे कपडे अश्लील पद्धतीने परिधान केले आहेत, हा सनातन धर्माचा अपमान आहे, असं त्यांनी म्हटलंय.