जळगाव : प्रतिनिधी
कर्ज फेडण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने परत मागितल्याच्या कारणावरून सासऱ्याने जावयाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जाखनीनगरमध्ये घडली. हा प्रकार एवढ्यावर न थांबता शालकासह पत्नी व मेहुणीने सुद्धा मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कपिल दिलीप बागडे यांनी सासरे महेश माचरे यांना कर्ज फेडण्यासाठी पत्नीचे दागिने दिले होते. हे दागिने त्यांनी सासऱ्यांकडे मागितले. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता महेश माचरे हे जावई कपिल यांच्या घरी आले. तू मला दिलेले दागिने का मागतो, ते मी तुला देणार नाही, असे बोलून त्यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉड हा जावई कपिल यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. नंतर शालकांनी सुद्धा कपिल यांना घट्ट पकडून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मुलाला मारहाण होते पाहून रत्नाबाई या भांडण सोडविण्यासाठी आल्या; पण त्यांना कपिल यांच्या सासू नुरी माचरे, पत्नी निकिता व मेहुणी यांनी मारहाण केली. त्यानंतर रहिवाशांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. कपिल यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल दाखल करण्यात आले आहे.
रात्री सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा मंगळवारी रात्री १० वाजता कपिल बागडे यांना एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्यांच्या फिर्यादीवरून सासरे महेश माचरे, सासू, नुरी माचरे, पत्नी निकिता बागडे, शालक, मेहुणी (सर्व रा. कंजरवाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.