नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. एका १२ वीत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत मुलीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याचे सांगितले जात असून, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेवेळी पीडित मुलगी घटनेच्या वेळी तिच्या लहान बहिणीसोबत होती. त्यावेळी या मुलीच्या चेहऱ्यावर अचानक अॅसिड हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास दिल्लीतील द्वारका मोड भागात घडली आहे. हल्लेखोर आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते असे सांगितले जात असून, जखमी मुलीला सफदरजंग रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पीडितेवर हा हल्ला नेमका का करण्यात आला याचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, दिल्ली पोलीस तपास करत आहेत.