जळगाव : प्रतिनिधी
डीपीडीसी अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणासह आपले पोलीस संकल्पनेच्या माध्यमातून ११२ वाहन खरेदीसाठी २ कोटी ६६ लाखाचा निधीस मंजुरी देण्यात आली आहे. यात २५ बोलेरो आणि ८५ होंडा शाईन दुचाकी, १ मारुती कार व १ बोलेरो पिकअप व्हॅन आदी वाहनांचा यांचा समावेश आहे.याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ११२ वाहने लवकरच पोलीस दलात दाखल होणार आहेत. याबाबत जिल्हा पोलीस दलास नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलाचे मनोबल उंचावणार असून अधिक सक्षम होण्यास मदत होईल तसेच CCTV कॅमेऱ्यासाठी ही १० कोटीं निधीची तरतूद करण्यात आली असून गृह विभागाकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर लागलीच डीपीडीसी मधून मंजुरी देणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. पोलिस दलात असलेली वाहने कालबाह्य झाल्याने तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिक पैसा खर्च होत असल्याने पोलिस दलाकडून जिल्हा नियोजन समितीकडे वाहनांसाठी पोलिस अधीक्षकांनी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. मागील महिन्यात झालेल्या डीपीडीसी च्या बैठकीत वाहन खरेदीसाठी पालकमंत्र्यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी यांनी ११२ वाहन खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. यासाठी २ कोटी ६५ लक्ष ९९ हजार २७८ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून महेंद्रा बोलेरो बी-२ बीएसव्हीआय या मॉडेलची २५ वाहने आणि ८५ होंडा HF DELUXE व ACTIVA BSVI च्या दुचाकी, १ मारुती कार व १ बोलेरो पिकअप व्हॅन गाड्या खरेदी करण्याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबविण्यात येत असून असून लवकरच एका कार्यक्रमात पोलीस दलात सदर वाहने दाखल करण्यात येणार आहेत.
मागीलवर्षी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार डीपीडीसी मधून २९ महेंद्र बोलेरो व ३८ शाईन होंडा प्रदान करण्यात आल्या होत्या. यासाठी २ कोटी ३० लक्ष निधी मंजूर होता. याहीवर्षी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा पोलीस दलासह ११२ वाहने मिळणार असून यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा पोलीस अधिक्षक राजकुमार, नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी सहकार्य केले आहे. लवकरच एका कार्यक्रमातपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ही वाहने जिल्हा पोलीस दलात सुपुर्द करण्यात येणार आहेत.