जळगाव : प्रतिनिधी
राज्यात राज्यपाल कोश्यारी व भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा निषेध करण्यासाठी आज शहरातील विविध संघटनानी मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बांभोरीसह महामार्गावर दोन वेळा १० मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी तात्काळ या आंदोलकांना ताब्यात घेत बाजूला नेत वाहतूक सुरू केली. मात्र काहीवेळाने पुन्हा आंदोलक रस्त्यावर आले, यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत तालुका पोलिस ठाण्यात नेले. दुपारी उशिरापर्यंत त्याना तेथेच बसवून ठेवण्यात आले होते.
मंत्री चंद्रकांत पाटील हाय हाय, कोश्यारी की हुशारी नही चलेगी, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, या घोषणा यावेळी देण्यात आल्या. देवेंद्र फडणवीस, शिंदे सरकारचाही निषेध करीत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसंघर्ष मोर्चा, बहुजन जनक्रांती मोर्चा, जिजाऊ ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, छावा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, अखिल भारतीय पारधी महासंघ, भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लीकन पॅथरसह अन्य संघटना सहभागी झाल्या.
या आंदोलनात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ, जळगाव मनपाचे उपमहापौर कुलभूषण पाटील, धरणगावचे लोकनियुक्त मा.नगराध्यक्ष निलेश चौधरी , रमेश पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, बहुजन जनक्रांती मोर्चाचे मुकूंद सपकाळे यांना रास्ता रोको करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले. शिंदे हे शिवरामनगरातील निवासस्थानापासून वाहनातून बसून घरून निघत असतानाच त्यांचे वाहन अडविण्यात आले. तासभराने त्यांना रामानंद पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमा झाल्याने दोन्ही नेत्यांना अटक करून कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्याबाहेर काढण्यात आले. यावेळी प्रतिभा शिरसाट, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, मंगला पाटील, सचीन सोमवंशी, निवेदिता ताढे आदी उपस्थित होते.