मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील यांची भेट घेऊन ठाकरे कुटुंबीयांच्या 19 बंगल्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
विशेष म्हणजे गौरी भिडे नावाच्या महिलेने ठाकरे कुटुंबावर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला ठाकरे कुटुंबीयांनी विरोध केला आहे. त्यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. मात्र आता सोमय्या यांनी 19 बंगल्यांच्या कथित घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करून ठाकरे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ केली आहे.
तेव्हाचे ठाकरे सरकारने आपल्या पदाचा, अधिकारांचा दुरुपयोग करुन शासकीय नोंदींमध्ये व दस्तऐवजांमध्ये खाडाखोड आणि फेरफार केले आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करावा. अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. ते पुढे म्हटले आहे की, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा चौकशी व कारवाई करण्यासाठी विनंती केली आहे. हा घोटाळा झाला असल्याचे प्रशासनाने आत्ता मान्य केले आहे. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. हे प्रकरण पीएसीएल घोटाळ्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने आगोदर प्रवीण राऊतला अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले. सीबीआयचा आरोप आहे की, पीएसीएल प्रकरणात गुंतवणूकदारांकडून 49,100 कोटी रुपये गोळा करण्यात आले आणि नंतर हा घोटाळा करण्यात आला. पत्राचाळ घोटाळ्यात जामिनावर सुटलेले संजय राऊत सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यामुळेच प्रवीण राऊत यांच्यामार्फत केंद्रीय एजन्सीने त्याला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.