जळगाव : प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कंत्राटी कामगार असलेला तरुण बेपत्ता होता. लोखंडी पुलाजवळ मंदिराच्या शेजारी सोमवारी त्याचा मृतदेह आढळला. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३६, रा. मेहरुण परिसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना उमाळ्याच्या जंगलातून ताब्यात घेतले.
प्रमोद शेट्टी हा शनिवारी घरी आला नाही म्हणून त्याचे वडील सुरेश शेट्टी यांनी रविवारी एमआयडीसी पोलिसात हरवल्याची तक्रार दिली. सोमवारी सकाळी ११ वाजता निमखेडी शिवारात गिरणा नदीवरील रेल्वे पूल महादेव मंदिराजवळ बकऱ्या चारणाऱ्या तरुणांना मंदिरामागे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह दिसला. त्यांनी ही माहिती तालुका पोलिसांना दिल्यावर निरिक्षक कुंभार, एलसीबीचे निरिक्षक किसन नजन पाटील व होम डीवायएसपी संदीप गावित हे आले. या ठिकाणी फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाला बोलावण्यात आले. मृताचे वडील व नातेवाईकांना बोलावून ओळख पटवण्यात आली. तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेट्टी याचा जुना भाडेकरू सुनील उर्फ साबीर नियामतखा तडवी (वय २६, रा. तांबापुरा) व सत्यराज नितीन गायकवाड (वय २६ रा. गणेश नगर) हे संशयित मारेकरी उमाळाच्या जंगलात लपलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, गुरुवारी सुनील तडवीने ‘तू माझ्या बायकोचा पाठलाग करणे सोडून दे, नाही तर तुला कायमचा संपवून टाकू’ अशी धमकी दिली होती’ असे कारण पुढे आले आहे.