जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या १९ जागांसाठी शनिवारी १०० टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील सर्व सातही केंद्रांवर दूध संघाच्या मतदानासाठी मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्साह दिसत होता. ही निवडणूक राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे विरुद्ध भाजपच्या नेत्यांमध्ये अटीतटीची होत आहे. त्यामुळे आता या निवडणुकीचा काय निकाल लागणार याकडे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. यात महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल तर भाजपा- शिंदे गट प्रणित शेतकरी विकास अशी लढत होती. आज १९ जागांसाठी आज जिल्ह्यातील सात केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरूवात झाली सकाळी मतदानाचा टक्का जरा कमी होता दुपारी बारानंतर मतदार मतदानासाठी केंद्रावर येताना दिसत होते.
.
मंत्र्यांसह मंदाकिनी खडसेंची प्रतिष्ठा पणाला
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत: जळगाव तालुका मतदारसंघातून उमेदवारी केली. तर भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनीही जामनेर तालुका मतदारसंघातून उमेदवारी करीत मैदानात उतरले होते. मंत्र्यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली.