मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने ते प्रचंड संतापले आहेत. त्यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर त्यांनी प्रचंड आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. “अरे हिंमत असेल तर समोर या. चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करु”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पिंपरीत चंद्रकांत पाटील यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय. पण या घटनेवर भाजप नेत्यांकडून संताप व्यक्त केला जातोय.
“मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सगळे कार्यक्रम करणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशाप्रकारे पराचा कावळा करणं, त्याचं तीन-तीनवेळा स्पष्टीकरण दिल्यानंतरही, दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हा भ्याडपणा, अरे हिंमत असेल तर समोर या. चला सर्व पोलीस डिपार्टमेंटला बाजूला करु”, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं. “अरे काय चाललंय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला एका अर्थाने त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे जपलं की एखाद्या गोष्टीचा विरोध हा लोकशाही मार्गाने करायचा, पण ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“या शाईफेकीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील. पण ही झुंडशाही चालणार नाही. आज समजा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छूट दिली असती तर हे केवढ्यात पडलं असतं? पण आम्ही आमची संस्कृती सोडणार नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘उद्यापासून पोलिसांच्या सुरक्षेत नसेल’
“शब्दाला शब्दाने टक्क देता येते. मी लगचे पत्रकार परिषद घेऊन माझं असं म्हणण्याचा हेतूच नाही, असं स्पष्ट केलंय. खरंतर गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत जाणं हे सरंजामशाहीवाल्यांना झेपत नाहीय. त्यामुळेच भ्याड हल्ले चालले आहेत. उद्यापासून पोलिसांची सुरक्षा नसेल. हिंमत असेल तर समोर या”, असं आव्हान त्यांनी दिलं.