धरणगाव : प्रतिनिधी
राज्यातील विरोधी पक्ष प्रत्येक शहरातील रस्त्यासाठी आक्रमक होत आंदोलने करीत आहे तर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका रस्त्यावर चक्क रस्त्याचे दोन भाग झाल्याचे दिसून आले आहे.
धरणगाव तालुक्यातील चमगाव फाटा ते उखळवाडी शेत रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच महिन्या आधी करण्यात आलेले आहे. या रस्त्याने जाणारे प्रत्येक नागरिक या रस्त्याचे आश्चर्य व्यक्त करीत आहेत. कारण या मुख्य रस्त्याच्या मधोमध एक मोठी भेग पडली आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी नेहमी बैलगाडी घेऊन जात असतात, त्यामुळे बैलांचा पाय या भेगात अळकून अपघात होण्याची शक्यता आहे. तर दुसरी बाब म्हणजे रस्त्याच्या बाजूला या ठेकेदाराने मुरूम देखील टाकलेला नसल्याने आरोप शेतकरी वर्गाने केला आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे शेतकरी म्हणत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी खूप त्रस्त झाले असून याकडे लवकरात लवकर सबधीत विभागाने लक्ष द्यावे अशी देखील शेतकरी मागणी करीत आहे.