लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून, या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे चेअरमन अप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्याशी चर्चा केली.
पदवीधर मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आमदार तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रातील मतदार व मविआच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदार तांबे व बाळासाहेब थोरात यांनी आज आप्पासाहेब देवकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवडणुकीच्या तयारी संदर्भात साधक-बाधक चर्चा केली. मविआच्या नेत्यांची या निवडणुकीत महत्त्वाचे भूमिका राहणार असून, आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी काय रणनीती असेल, यासंदर्भात या तिन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. श्री देवकर यांनी मविआकडून आमदार तांबे यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांना दिले.
यावेळी श्री देवकर यांनी आपल्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांचा सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे डी. जी पाटील, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅठ. संदीप पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते.