भुसावळ : प्रतिनिधी
प्रेरणा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन महिलांकडील पर्स चोरट्यांनी लांबवली. यात सहा लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम होती. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार ५ रोजी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरातमधील वडोदरा येथील वंदना दादाराव मेश्राम (५५) या पती व मुलासह गाडी क्र. २२१३८ प्रेरणा एक्स्प्रेसने नागपूरकडे जात होत्या. या गाडीने जळगाव स्थानक सोडल्यानंतर चोरट्याने वंदना मेश्राम तसेच याच बोगीतील पुष्पलता सांभारे या दोन्ही महिलांची पर्स लांबवली.
एका पर्समधून चार तोळे सोन्याची मोहन माळ, दोन तोळ्याच्या दोन बांगड्या, पंचवीस हजाराचा मोबाइल आणि एक लाख रुपये रोख असे चार लाख चाळीस हजारांचा ऐवज तर पुष्पलता सांभारे यांच्या पर्समधील अडीच तोळ्याचे मणी व मंगळसूत्र दहा हजारांचा मोबाइल, २१ हजार रुपये रोख असे एक लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.
भुसावळ रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग
या दोन्ही महिलांकडील पर्समधून सहा लाख सहा हजार सातशे रुपयांचा ऐवज व रोख रक्कम घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला. ही घटना ५ रोजी घडली. याबाबत ७ रोजी नागपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो शून्य क्रमांकाने भुसावळ रेल्वे पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. तपास पीएसआय पाटील हे करीत आहेत.