पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न पुन्हा राज्यात पेटला असून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमाप्रश्नावरुन सुरु असलेल्या शाब्दिक वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर मंगळवारी कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव-हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक, शाईफेक केली आहे. या घटनेने सीमावाद आणखीच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी जोरदार आंदोलनही केले. त्याचदरम्यान बेळगावातील राडाचे पुण्यात पडसाद उमटू लागले आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात जोरदार राडा देखील करण्यात आला आहे.
कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाल्याने राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फोन केला. बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली आहे.
यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पेटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पुन्हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर कोगनोळी जवळ शिवसेना ठाकरे गट आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे पोलीसही सीमेवर तैनात आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.