लाईव्ह महाराष्ट्र : वाढदिवसाचे बॅनर फाडल्याच्या प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी तब्बल सहा लाख रूपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गावर भुसावळ ते साकेगावच्या दरम्यान बंटी पथरोड याच्या वाढदिवसाचे पोस्टर लावण्यात आले होते. यामुळे पथरोड व सहकार्यांनी साकेगाव येथील मयूर मदन काळे याला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. पथरोड व सहकार्यांनी त्याला पिस्तूल, चॉपर व शस्त्रांचा धाक दाखवून ५ लाख रूपये खंडणीची मागणी केली. मागणी मान्य झाल्यावर त्यास सोडले.
यानंतर मयूर काळे याने सागर भोई याला ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी दोन लाख रूपये दिली. तर, या टोळक्याने मयूरला उर्वरित पैशांसाठी धमक्या देण्यास प्रारंभ केला. यामुळे त्याने अखेर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. यानुसार बंटी पथरोड यांच्यासह नितीन कोळी (रा.अंजाळे. ता.यावल), हर्षल पाटील (भुसावळ), गोलू जव्हेरीलाल कोटेचा, सागर भोई (रा.साकेगाव) आणि ओम या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील सागर भोई याला अटक करण्यात आली असून त्याला १४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.तर बंटी पथरोडसह इतरांच्या मागावर पोलीस आहेत. या प्रकरणाचा तपास तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार हे करत आहे.