जळगाव : प्रतिनिधी
एकामागून एक भाजप नेते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं करीत आहेत. राज्यपालांच्या विधानानंतर तर राज्यभरात संताप व्यक्त होतोय. त्यावरुनच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोखठोक विधान केलं आहे.गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवरायांच्या बाबतीत कोणत्याही ‘मायच्या लाल’ला बोलण्याचा अधिकार नाही. मग कुणीही असो. राज्यपाल असो की राष्ट्रपती असो. छत्रपती हे देवांचे देव आहेत. त्यांच्यापेक्षा कुणीही मोठं नाही.
‘मंत्रिपद खड्ड्यात गेलं तरी चालेल पण राज्यपालांना सोडणार नाही. महाराजांबद्दल चुकीचं बोलणारा तो कुणीही असो वा कुठल्याही पक्षाचा असो… चुकीला माफी नाही” असा इशाराच त्यांनी दिलाय. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावरुन वादग्रस्त विधान केलं आहे. शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं ते म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचं सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.