जळगाव : प्रतिनिधी
ड्युटी संपवून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव टँकरने धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी खोटेनगरजवळील हॉटेल राधिका समोर घडली. सचिन चंद्रकांत फेगडे (४२, रा. शंकरराव नगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. टँकरचालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याला अटक केली आहे.
शंकरराव नगरात सचिन फेगडे हे पत्नी, मुलगी व भावासोबत वास्तव्यास होते. बांभोरीजवळील एका कंपनीत ते नोकरीला आहेत. शुक्रवारी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर ते दुचाकीने घरी निघाले. खोटेनगरजवळील राधिका हॉटेलसमोर ओव्हरटेक करणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये ते दुभाजकावर आदळल्याने तसेच टँकर त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरु असतांना रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.