लाईव्ह महाराष्ट्र : भुसावळ शहरातील झेडटीसी भागाजवळच्या तापी नदी पात्रात गणपती विसर्जनासाठी कुटुंबासोबत गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून तिच्या भावाला वाचवण्यात यश आले आहे.
झेडटीसी परिसरात मनीष यादव हे वास्तव्याला आहेत. दीड दिवसानंतर ते आज सकाळी गणेश विसर्जन करण्यासाठी झेडटीसी जवळच्या तापी नदी पात्रात पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांची मुलगी अनन्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. मुलगा आर्यनराज हा देखील पाण्यात उतरल्याने तो देखील बुडू लागला होता . त्यांनी आरडाओरडा केला असता परिसरातून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली.
यात आर्यनराज याला वाचविण्यात यश आले असले तरी अनन्या मनीष यादव ही बालिका मात्र बुडून तिचा मृत्यू झाल्याने यादव परिवार शोकाकुल झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अनन्याच्या मृतदेहाचा शोध सुरू होता.