मुंबई : वृत्तसंस्था
सोशल मिडीयावर दिसणारे व्हिडीओमुळे आता अल्पवयीन मुल सुद्धा गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकत आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरामध्ये दहावीत शिकणारा एका विद्यार्थ्याने दुसरा विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकू हल्ल्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला असून जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी विद्यार्थ्याला 19 टाके लागले आहेत. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडिल एका खासगी शाळेत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून या घटनेचा परिसरातील नागरिकांनी चित्रित केलेला व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून घेतला आहे.
कांदिवली पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत 26 नोव्हेंबर रोजी दहावीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये पूर्वीच्या एका भांडणावरून वाद झाला यातील एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. या घटनेचा व्हिडिओ परिसरातील नागरिकांनी मोबाईलवर चित्रित केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला जवळील ट्रायडंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या हल्ल्यामुळे विद्यार्थ्याला 19 टाके पडले होते, उपचारानंतर बुधवारी त्या विद्यार्थ्याला डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, या चाकू हल्ल्याची घटना उपस्थितांनी चित्रित केली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. व्हिडिओची दखल घेऊन, कांदिवली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 326 (स्वेच्छिकपणे धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी विद्यार्थी सध्या फरार असून कांदिवली पोलीस मुलाचा शोध घेत आहेत.