लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव-महापालिकेच्या आयुक्तपदावरून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडी शुक्रवारी देखील पाहण्यास मिळाल्या. विद्या गायकवाड यांनी नवनियुक्त मनपा आयुक्त देवीदास पवार यांची भेट घेऊन मॅटने दिलेल्या आदेशाची प्रत त्यांना दिली. मात्र, गायकवाड यांनी पदभार न घेता आल्या पावली परत जावे लागले. तर मॅटच्या आदेशाचा अभ्यास करून, विधीतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले.
राज्य शासनाने विद्या गायकवाड यांची बदलीचे आदेश दिले होते. त्या आदेशाविरोधात विद्या गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली होती.त्यात मॅटने राज्य शासनाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्या आदेशाची प्रत घेऊन गायकवाड शुक्रवारी दुपारी ४ वाजता महापालिकेत दाखल झाल्या. त्यांनी आयुक्त देवीदास पवार यांची भेट घेऊन, आदेशाची प्रत दाखवली. दोन्ही आयुक्तांची बंदव्दार सुमारे अर्धातास बैठक झाली. या भेटीनंतर विद्या गायकवाड या आयुक्तांच्या दालनाबाहेर येवून आपण केवळ मॅटच्या निर्णयाची प्रत देण्यासाठीच महापालिकेत आल्याचे त्यांनी सांगितले. तर देवीदास पवार यांनी सांगितले की, मॅटच्या आदेशाची प्रत मिळाली असून, याबाबत आता विधीतज्ज्ञांचा सल्ला घेऊ.त्यामुळे मनपात आगामी . काळात आयुक्तपदावरुन मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
आयुक्त पवार अजिंठ्याहून परत आले
महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (मॅट) ने आयुक्तांच्या बदली आदेशाला स्थगिती दिल्यामुळे विद्या गायकवाड या मनपा आयुक्तपदाचा कारभार पुन्हा घेतील अशी चर्चा सुरु झाली होती.नवीन आयुक्त पवार हे देखील एका खासगी कार्यक्रमासाठी नांदेडला निघाले होते. मात्र, गायकवाड महापालिकेत येऊन सूत्रे हातात घेतील अशी माहिती पवार यांना मिळताच हे अजिंठ्याहून पुन्हा परत आल्याची माहिती माहिती समोर येत आहे.