जळगाव : प्रतिनिधी
राज्यात पसरलेली गोवरची साथ आता जळगाव शहरातही आली आहे. शहरातील एका भागात तब्बल अकरा रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या दवाखाना विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम लावलाणी यांनी दिली. मात्र, या रुग्णांची प्रकृती चांगली असून, उपचारानंतर ते घरीच आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
जळगाव महापालिकेत नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार यांनी बुधवारी दि ३० रोजी महापालिका दवाखाना विभागाची बैठक घेत गोवर साथीबाबत जळगावातील स्थितीची माहिती त्यांनी घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले, की शहरात गोवरच अकरा रुग्ण आढळले आहेत. ज्या भागात लसीकरणाला नकार देण्यात येतो, त्या भागातील हे रुग्ण आहेत. रुग्ण आढळून आलेल्या भागात आरोग्य विभागातर्फे सर्व्हे सुरू आहे.
ज्या मुलांना गोवरची लस दिलेली नाही, त्या मुलांना गोवरची लस महापालिका वैद्यकीय विभागातर्फे देण्यात येत आहे. काही भागात नागरिक लसीकरण करण्यास नकार देत आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. लसीकरण झालेल्या मुलांना अधिकचा डोस देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून आदेश येईल. त्यानुसार ते लसीकरण करण्यात येईल.
– डॉ. राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका, जळगाव