मुंबई : वृत्तसंस्था
शिवप्रताप दिनानिमित्त किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांना अधिकार नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, शिवप्रताप दिनानिमित्त राज्यात जल्लोष नेहमीच होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांनी धिक्कार केला असता तर त्यांच्या अभिवादनाचे महत्तव नक्कीच वाढले असते.
राज्यपाल व त्रिवेदींचा धिक्कार करणे तर सोडाच उलट सरकार त्यांचे समर्थन करत आहेत. त्यामुळे आज गडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करण्याचा त्यांना अधिकार आहे का?, हा प्रश्न समस्त महाराष्ट्रातील जनता विचारत आहे. या मुद्द्यावर खासदार उदयनराजेंचे अश्रू आम्ही पाहले आहेत. ते केवळ त्यांचे अश्रू नाहीत तर समस्त महाराष्ट्राचे, प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील तो आक्रोश आहे. पण मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार राज्यपालांना हटवण्याबाबत हतबल आहेत. आणि आज प्रतापगडावर जाऊन ते ढोंग करत आहेत.
संजय राऊत म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. मात्र, मुख्यमंंत्री शिंदे तोंड शिवून बसले आहेत. त्यामुळेच राज्यपाल अजूनही राजभवनात विराजमान आहेत. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही शिवरायांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. त्यांच्याबद्दलही मुख्यमंत्री चकार शब्द बोललेले नाहीत. त्यामुळे तेदेखील अजून पदावर आहेत. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाने संजय राऊतांना समन्स बजावले आहे. त्यानुसार त्यांना उद्या कोर्टात हजर रहायचे होते. मात्र, याबाबत राऊत म्हणाले की, सध्या मी माझा वकिल बेळगावला पाठवला आहे. त्यामुळे उद्या आपण कोर्टासमोर हजर होणार नाही. त्यापुढील सुनावणीत हजर राहू.