एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील आडगाव येथील श्री संत सावता माळी मंगल कार्यालयाच्या जवळ राहणारे युवराज सुखदेव महाजन यांच्या घरात दिवसा घरफोडी झाली असून घरातील कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून 56 हजार रुपये किमतीचे दागिन्यांची चोरी झाली आहे.
युवराज महाजन हे पत्नीसह बाहेरगावी गेले होते व मुलगा पत्नीसह शेतात कापूस वेचण्यासाठी गेला होता. त्यांच्या पश्चात ही चोरी झाली आहे. युवराज सुखदेव महाजन व त्यांच्या पत्नी हे दरेगाव येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले. त्यानंतर मुलगा व सून सकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेले.
घर बंद पाहून चोरट्यांनी संधी साधत घरातील कपाटाचे लॉक तोडून, त्यातील सोन्याची सोनसाखळी, सोन्याच्या बाह्या ,लहान मुलांसाठीच्या सोन्याच्या पतक्या,ओम पान, चांदीचे कडे असे एकूण 56 हजार किमतीचे दागिने चोरीला गेले .मुलगा संध्याकाळी घरी आल्यावर त्यांनी हा प्रकार पाहिला व बाहेरगावी असलेल्या वडिलांना सदर बातमी सांगितली . त्याबाबत श्री युवराज सुखदेव महाजन यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कासोदा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून ,भारतीय दंड संहिता 380, 454 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ए.पी.आय .सौ .नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल युवराज कोळी तपास करत आहे.