मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे व शिंदे गटाचा वाद आता पुन्हा वाढत असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांची बुलडाणा येथे झालेल्या सभेनंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी तर बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक लढण्याचंच आव्हान दिलं आहे. बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनीच आता, थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात बुलढाण्यातून निवडणूक लढवावी असं खुलं आव्हान त्यांना देण्यात आलं आहे. प्रतापराव जाधव एवढे आक्रमक का झाले? याचे नेमके कारण आहे ते म्हणजे 2 दिवसांआधीच उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये सभा घेतली होती आणि प्रतापरावांना गद्दार खासदार म्हणत भाजपच्या तिकीटावर लढणार नाही हे जाहीर करा, असा टोला लगवला होता.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार होते. आणि सत्तास्थापन केल्यानंतर आतापर्यंत 18 पैकी 13 खासदार शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामध्ये प्रतापराव जाधव हेही होते. आमदार आणि खासदारकीची ही दोन्ही हॅटट्रिकचा पराक्रम प्रतापराव जाधव यांच्या नावावर आहे. 1995मध्ये मेहकर मतदारसंघातून प्रतापराव जाधव पहिल्यांदा आमदार झाले होते, त्यानंतर 1999 आणि 2004 मध्येही तेच विजयी झाले होते. 2009 मध्ये शिवसेनेनं त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं होतं आणि जाधव खासदारही झाले होते. तर 2014 आणि 2019 मध्येही खासदारकीमध्ये त्यांनीच विजयावर शिक्का मोर्तब केला होता. पण आता उद्धव ठाकरेंनी गद्दार खासदार म्हटल्यानं जाधवांनी ठाकरेंनाच बुलढाण्यातून लढण्याचं चॅलेंज दिलं आहे.
यावर विनायकराव राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, प्रतापरावांची भंबेरी उडाली आहे त्यामुळे ते बेताल वक्तव्य करत असल्याची टीका त्यांच्यावर केली आहे. बुलढाणाचे आमचे उमेदवार दिड लाखांनी निवडुन येणार, जाधवांनी हिंमत्त असेल तर शिंदे गटाच्या निशाणीवर लढून दाखवा असा पलटवारही त्यांच्यावर करण्यात आला. प्रतापराव जाधव यांनी टीका केल्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांतल्या शिंदे गटाच्या मंत्र्य़ांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. तर त्यांनी थेट उद्धव ठाकरेंचं नाव घेऊनच त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय गायकवाड, आणि शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर हे सर्व नेते आता उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडत आहेत.