मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून नेहमी वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यपाल भगतसिंह यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना, शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय, छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीदेखील राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.
आपल्या पदाचा राजीनामा अथवा पदमुक्त होण्याबाबतचे पत्र राज्यपालांना राष्ट्रपतींना पाठवावे लागेल. त्यानंतर त्यांच्या पत्रावर कार्यवाही होईल. केंद्र सरकारकडून राज्यपाल यांची बदली होऊ शकते. मात्र, ही बदली होणे म्हणजे राज्यपालांवरील कारवाई करण्यात आली, असे संकेत देशभरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपालांकडून स्वत: हून पदमुक्त होण्याची इच्छा राष्ट्रपतींकडे व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे.