अहमदाबाद : वृत्तसंस्था
देशातील गुजरात राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असतांना पोरबंदर जिल्ह्यात जवानांच्या आपापसात झालेल्या चकमकीत भारतीय राखीव बटालियनचे (आरपीएफ) दोन जवान शहीद झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जवान आपापसात का भिडले हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी तताडीने दखल घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ज्या सैनिकांमध्ये ही चकमक झाली आणि त्यानंतर गोळीबार झाला, ते सैनिक निवडणूक ड्युटीसाठी आले होते, असे आढळून आले आहे.
एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर एके ४७ मधून गोळीबार केला आहे. मात्र, गोळीबार झाला तेव्हा कोणताही जवान ऑन ड्युटी नव्हता. पोलीस सध्या या प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी मृत जवानांचे सहकारी आणि जवानांच्या दुसऱ्या गटाच्या सहकाऱ्यांचीही चौकशी करत आहेत. पोरबंदरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी ए.एम.शर्मा यांनी सांगितलं की, संध्याकाळी सैनिकांमध्ये कशावरून तरी आपसात वाद झाला, त्याचं रुपांतर काही वेळातच हाणामारीत झालं. यानंतर एका जवानाने आपल्या एके-47 रायफलमधून अनेक राऊंड फायर केले. या घटनेतील जवान भारतीय राखीव बटालियनचे (मणिपूर) असून ते सध्या गुजरातमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तैनात आहेत. जवानांमध्ये भांडण कशामुळे झाले याचा आम्ही सध्या तपास करत आहोत.