मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी अनेक घडामोडी घडल्या. राज्यात सत्तांतर झालं आणि त्याचं मुख्य केंद्रस्थान राहिलं ते म्हणजे गुवाहाटी. सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या गुवाहाटीचं स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळंच आहे. दरम्यान राज्यात सत्तांतर व्हावं झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जात आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी जात आहेत. यावेळी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांसह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सदिच्छा भेट घेणार असल्याची माहीती समोर येत आहे. जून महिन्यामध्ये राज्यात राजकीय भूकंप झाला होता. यावेळी आसाममधील गुवाहाटी हे राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. नाराज झालेले नेते आणि एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये थांबले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत. सर्व समर्थक आमदार खासदार मंत्री म्हणाले की पुन्हा एकदा देवीच्या दर्शनाला जाऊ बोलल्यानंतर हा दौरा नियोजित केला आहे. तर आम्ही हे सर्व राज्यासाठी करत आहोत. राज्यातल्या बळीराजाला चांगले दिवस येऊ देत. राज्यातली जनता सुखी होऊ देत. राज्यावर आलेली संकट अनिष्ट दूर होऊ देत यासाठी आमचा प्रयत्न असतो. तिकडे जाण्याचा आमचा कोणताही अजेंडा नाही. राज्यातल्या जनता सुखी राहू देत. राज्यातली अतिवृष्टी, संकट टळू देत राज्याच्या जनतेला सुखी ठेव यासाठी आम्ही देवीकडे प्रार्थना करणार आहोत.