मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदे सरकार कधी हि कोसळू शकते असे विरोधाकडून आरोप होत असतानाच मुख्यमंत्री शिंदे खूप तणावात आल्यानंतर त्यांनी अचानक ज्योतिषाची भेट घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. झालं असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकच्या दिशेने निघाले.. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील मिरगाव येथील एका ज्योतिष्याकडे हात दाखवल्याची चर्चा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा नसावी, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शिर्डी येथून मुख्यमंत्र्यांचा ताफा हेलिपॅडच्या दिशेने जाईल, अशी शक्यता असतानाच सगळ्या गाड्या अचानक सिन्नर तालुक्याच्या दिशेने वळाल्या. वावी गावातील मिरगावच्या इशानेश्वर मंदिरात या गाड्या थांबल्या..
मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नीने येथे दर्शन घेतलं. महादेवाला दुग्धाभिषेक करत पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. पण खरी चर्चा यानंतरची सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कॅप्टन अशोक खरात यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून भविष्य जाणून घेतल्याचं म्हटलं जातंय.
अनेक राजकीय नेते, सेलिब्रेटी यांच्यासह व्यापारी लोकही अशोक खरात यांच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जातात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही अचानक मिरगावात ताफा वळवून आपले भविष्य जाणून घेतले की काय, अशी चर्चा रंगली आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषाला भेटल्याची चर्चा आहे. पण घटनात्मक पदावर विराजमान व्यक्तीने असे वर्तन करणे बेजबाबदारपणाचे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र अनिसचे राज्य कार्यलवाहक कृष्णा चांगगुडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. अंनिसच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. त्या म्हणाल्या, ‘ प्रत्येकाची श्रद्धा असते, श्रद्धेवर आमचा विश्वास, मात्र अंधश्रद्धेवर नाही.. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेविरोधात मोठं काम केलं.. आयुष्य पणाला लावलं.. पण घटनात्मक पदावरील व्यक्तीने श्रद्धा ठेवावी, मात्र अंधश्रद्धेबद्दल जनतेचं मत वेगळं आहे, हे लक्षात घ्यावं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.