औरंगाबाद : वृत्तसंस्था
‘मी मारायला पण घाबरत नाही आणि मरायला पण घाबरत नाही … मग कोण पण समोर येऊ दे..’ असे रात्री सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्या पाटोदा तालुक्यातील जाधव वस्तीवरील दूध विक्रेेता तरुण कृष्णा दिलीप जाधव याचा तालुक्यातील निरगुडी-लिंबादेवी पुलाच्या जवळ बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास संशयास्पदरीत्या मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी त्याच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असून ते पोलिसांना अहवाल देणार आहेत. अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ उकलणार आहे. पाटोदा तालुक्यातील जाधव वस्तीवरील कृष्णा जाधव हा दररोज सकाळी घरचे दूध लिंबादेवी फाटा येथे विक्रीसाठी दुचाकीवरून जात होता. मंगळवार, २२ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याने रात्री उशिरा सोशल मीडियावर ‘मी मरायला घाबरत नाही आणि मारायलाही घाबरत नाही… कोण पण समोर येऊ दे…’ असे स्टेटस ठेवले होते. परंतु त्याचे स्टेटस फारसे कोणीच पाहिले नाही. दरम्यान, बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी कृष्णा नेहमीप्रमाणे घरातील दूध बरोबर घेऊन दुचाकीवरून (एमएच १२ सीयू २९१३) लिंबादेवी फाट्यावरील डेअरीकडे निघाला होता. सकाळी सात वाजेच्या सुमारास निरगुडी ते लिंबादेवीदरम्यानच्या परिसरातून पुलाजवळून जाणाऱ्या काही ग्रामस्थांना कृष्णा हा गंभीर अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी त्यावेळी आरडाओरड करत लोक गोळा केले.
रस्त्यावरून जाणाऱ्या काही ग्रामस्थांनी त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिल्यानंतर कृष्णाला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला आणि उजव्या हाताच्या खांद्याजवळही गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
कुटुंबीय ग्रामस्थांकडून घातपाताचा संशय मंगळवारी रात्री काही तास अगोदर कृष्णाने सोशल मीडियावर ठेवलेले संशय निर्माण होणारे स्टेटस पाहता त्याचा मृत्यू हा संशयास्पद असून त्याचा धारदार शस्त्राने वार केल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय कुटुंबीय व ग्रामस्थांना आहे. याप्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेबाबत सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले.