धरणगाव : प्रतिनिधी
पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. हा अपघात धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ झाला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते. एमएच १९ डीव्ही ४१९९ क्रमांकाच्या शासकीय वाहनाने निघाले होते चौधरी. धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून धडक दिली. यात ड्रायव्हरच्या बाजूच्या सिटवर बसलेले एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. गटविकास अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी देखील अपघातस्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या घटनेची पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. एकनाथ चौधरी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे यावल जि, जळगांव येथील गटविकास अधिकारीपदाचा देखील अतिरिक्त कार्यभार होता. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.