नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्याकांडाचं प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा देशाची राजधानी दिल्ली एकदा क्रूरतेच्या घटनेनं हादरलीय. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील कालका पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलंय.
शाळेतील एका सफाई कामगारावर विद्यार्थिनीसोबत हा अघोरी प्रकार घडवल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपी सफाई कामगाराला अटक केलीय. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आलेली नाहीये.
दिल्लीत याआधीही शाळेतील विद्यार्थिनींसोबत अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या वर्षी 6 ऑक्टोबरला दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात 11 वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला होता. शाळेतील दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांवर एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.