मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडी युती होण्याबाबत गेल्या काही दिवसापासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. २० नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावरही दिसून आले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीबाबतच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी सुचक विधान केलं आहे. तसेच देशात हुकूमशाही असून त्याविरोधात सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
“युतीचा विषय हा केवळ मुंबई महापालिकेपुरता मर्यादित नाही. सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा देणं महत्त्वाचं आहे. देशात आणि राज्यात परिवर्तन घडवण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना इतर राज्यातील विरोधीपक्ष, अशा सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हा आदर्श असू शकतो. प्रकाश आंबेडकर हे सध्याच्या हुकूमशाही विरोधात ठामपणे उभे राहिले, तर त्यांना मोठा जनाधार मिळू शकतो. त्यादृष्टीने सकारात्मक पाऊलं पडत आहेत”, अशी सुचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरेंकडूनही प्रकाश आंबेडकरांचे कौतुक
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच प्रबोधनकार डॉटकॉम या वेबसाईटच्या उद्घाटनानिमित्त उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच व्यासपीठावर दिसून आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांचे कौतुक केले होते. “माझी आणि प्रकाश आंबेडकर यांची ओळख नाही, असे नाही. आम्ही बोलतो, भेटतो. पण त्यांची भेट घ्यायची म्हणजे वेळ काढून भेटायला हवं. कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा प्रकाश आंबेडकर आहेत. त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे मिनिटांचं गणित नसायला हवं.” असे तसेच म्हणाले होते. प्रबोधनकार डॉटकॉम या वेबसाईटच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनीही युतीचे संकेत दिले होते. “राज्यात निवडणुका कधी लागू होणार? यावर सर्व अवलंबून आहे. ताबोडतोब निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही ताबोडतोब एकत्र येऊ, नंतर निवडणुका जाहीर झाल्या तर आम्ही नंतर एकत्र येऊ”, असेते म्हणाले होते.