नेहमीच सर्वाना ॲसिडिटीच्या समस्येमुळे त्रस्त असतात त्यावर नेमका उपाय आजही काहीना सापडलेला नाही. पोटात काही उलट-सुलट पदार्थ गेला नाही की लगेच गॅस, अपचन, आंबट ढेकर येणे असा त्रास दिवसभर होत राहतो. या समस्यांमुळे पोटदुखी , पोट जड होणे, चिडचिड होणे, अशा समस्याही उद्भवतात. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी बरेचसे लोक गॅसचा त्रास दूर करणारी औषधे, गोळ्या यांचे सेवन करण्यास सुरवात करतात. ॲसिडची समस्या अनेकदा उद्भवत असेल तर तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे वेदना होणे, जळजळ होणे असेही त्रासही होतात.
अशा परिस्थितीत तुम्ही अधिक तळलेले पदार्थ तसेच मसालेदार पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. आपली जीवनशैली तसेच आहार-विहारात बदल केल्यास ॲसिडिटीच्या समस्येवरही मात करू शकता. यासाठी काळे मीठ, ओवा यांचे एकत्र सेवन केल्यास खूप आराम मिळतो. या दोन्ही पदार्थांमध्ये ॲसिडिटी दूर करणारे काही घटक असतात. त्याबद्दल अधिका माहिती जाणून घेऊया.
ॲसिडिटी दूर करण्यासाठी ओव्याचा वापर
पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी ओवा हे सर्वोत्तम औषधी मानले जाते. त्यामध्ये कॅल्शिअम, फायबर, लोह, फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, राइबोफ्लेविन, फॉस्फरस इत्यादी तत्वे असतात. ओव्याचे सेवन केल्याने पोटासोबतच शरीरालाही अनेक प्रकारे फायदा होतो. ही पोषक तत्वे पोटातील ॲसिड रिफ्लेक्सच्या समस्येपासून संरक्षण करतात. गॅसपासून आराम मिळविण्यासाठी, तुम्ही ओवा चावून खा व त्यानंतर कोमट पाणी प्या. ओवा खाल्याने पचनशक्ती देखील मजबूत होते.
ॲसिडिटी दूर करण्यासाठी काळे मीठ उपयोगी
काळं मीठ हे नेहमीच्या (पांढऱ्या) मीठापेक्षा अधिक फायदेशीर असते. त्यामध्ये मिनरल्स, सोडिअम क्लोराइड, मॅग्नेशिअम ही पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात. पोटाच्या समस्या दूर करायच्या असतील काळ्या मीठाच सेवन करावे. गॅस, अपचन, आंबट ढेकर येणे, बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांपासूनही मुक्ती मिळते. तसेच पोट फुगणे, सूज येणे हे त्रासही कमी होतात.
ॲसिडिटी दूर करण्यासाठी ओवा आणि काळं मीठ असे करा सेवन
जर तुम्हाला वारंवार गॅसेस, अपचन, पोट फुगणे असे त्रास होत असतील तर काळे मीठ व ओवा यांचे एकत्रित सेवन करावे. 1 चमचा ओवा आणि 1 चमचा काळं मीठ घ्यावे. एका कढईत हे द्नोही पदार्थ टाकून चांगले भाजून घ्यावेत. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याची पूड करून घ्यावी. कोमट पाण्यासह ही पूड सेवन करावी. अथवा मधासोबतही तुम्ही ही पूड खाऊ शकता. सतत 3 ते 4 दिवस ही पूड खाल्याने पोटाच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल.