जळगाव : प्रतिनिधी
याही वर्षी पूर्ण भरलेल्या गिरणा धरणातून शेती सिंचनासाठी ३ व बिगर सिंचनासाठी २ अशी एकूण ५ आवर्तने जिल्ह्यासाठी सोडण्यात येणार असल्याचा निर्णय आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. गिरणा धरणातून दोनच आवर्तने मिळणार असतांना शेतकऱ्यांची वाढती मागणी व गरज लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आणि लाभक्षेत्राच्या परिसरातील जनतेच्या हितासाठी तिसरे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सिंचनासाठी अतिरिक्त ४ थे आवर्तना बाबत पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पाण्याची मागणी नुसार विभागाने निर्णय घेण्याचे ठरले. या अनुषंगाने गिरणा धरणातून अनुक्रमे १५ – २० डिसेंबर, १४ -२० जानेवारी आणि १६- २१ फेब्रुवारी रोजी ३ आवर्तने सुटणार आहेत. तसेच बिगर सिंचनासाठी मागणीनुसार एप्रिल व मे महिन्यात २ आवर्तन सोडण्यात येणार आहे. यामुळे गिरणातील शेती सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाण्याचा शेवटच्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे.
या संदर्भात वृत्त असे की, जिल्हास्तरीय कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांकडे असलेली सिंचन -बिगर सिंचन थकित पाणीपट्टी भरण्याचे अधीक्षक अभियंता एस. डी. दळवी यांनी आवाहन केले. या बैठकीला समिती सदस्य दत्तू ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अधिक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधीकरण एस.डी. दळवी, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. अग्रवाल, जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर , निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, महसूलचे नायब पाटबंधारे विभागाचे डी. बी. बेहेरे, गिरणा परिसरातील सर्व क्षेत्रीय उपअभियंता विजय जाधव, हेमंत पाटील, प्रवीण पाटील, एस. आर. पाटील व अधिकारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बैठकीचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता सुभाष चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता एस. डी. दळवी यांनी सिंचन पाणी अवर्ताना संदर्भात सविस्तर माहिती विशद केली तर आभार कार्यकारी अभियंता डी.पी. अग्रवाल यांनी मानले.
गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५३ वर्षात ते १३ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या ४ वर्षांपासून हे धरण लागोपाठ १०० टक्के क्षमतेने भरले आहे. यंदा देखील धरण पूर्ण भरल्याने यातील पाण्याचा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव, धरणगाव व अमळनेर तालुक्यातील २३८२५ हेक्टर जमीनीला सिंचनासाठी लाभ होणार आहे. या अनुषंगाने गिरणा धरणातून २ च्या एवजी 3 आवर्तने सोडण्यात यावीत असे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच सिंचनासाठी अतिरिक्त ४ थे आवर्तना बाबत पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पाण्याची मागणी नुसार विभागाने निर्णय घेण्याचे ठरले. तसेच यातील शेती सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पहिले आवर्तन धरणातून १५-२० डिसेंबर रोजी सुटणार असून यातून १०६.२५ दशलक्ष घन मीटर इतके पाणी सोडण्यात येणार आहे. अनुक्रमे १५ – २० डिसेंबर, १४ -२० जानेवारी आणि १६- २१ फेब्रुवारी रोजी ३ आवर्तने सुटणार आहेत. तसेच बिगर सिंचनासाठी मागणीनुसार एप्रिल व मे महिन्यात 2 आवर्तन सोडण्यात येणार आहे. तर पालकमंत्र्यांनी खास शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून फेब्रुवारीमध्ये रोजी १०६.२५ दशलक्ष घन मीटर इतक्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गिरणा धरणातील पाणी हे शेवटच्या शेतकर्यापर्यंत पोहचणार आहे.
बिगर सिंचन पाणी वापर
गिरणा प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालामध्ये सिंचनाव्यतिरिक्त कुठल्बायाही बाबींसाठी पाणी वापराची तरतूद केलेली नाही. तथापि बदलत्या परिस्थितीनुसार बिगर सिंचनासाठी शासनाने वेळोवेळी मंजुऱ्या दिलेल्या आहेत. गिरणा प्रकल्पा अंतर्गत पिण्यासाठी अवलंबून असणाऱ्या संस्थामध्ये मालेगाव महानगरपालिका, चाळीसगाव, भडगाव व पाचोरा नगरपालिका तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या २ योजनांचा समावेश असून चाळीसगाव, भडगाव ,पाचोरा व एरंडोल तालुक्तायातील १५४ गावांचाही समावेश आहे.
सिंचन -बिगर सिंचन थकित पाणीपट्टी भरण्याचे आवाहन
गिरणा पांझण प्रकल्पावरील सिंचन व बिगर सिंचनची मागील वर्षाची थकबाकी १८ कोटी १२ लक्ष ०१ हजार असून चालू वर्षाची पाणीपट्टी आकारणी ८ कोटी १८ लक्ष ८६ हजार इतकी आहे. ऑक्टोबर २०२२ अखेर २ कोटी २१ लक्ष १४ हजार वसुली झाली असून शेतकऱ्यांकडे तब्बल २४ कोटी ०७ लक्ष १९ हजार इतकी थकबाकी आहे.थकबाकी वसुलीबाबतही बैठकीत चर्चा झाली असून टप्प्या टप्याने शेतकऱ्यांनी थकबाकी भरण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता एस. डी. दळवी यांनी केले आहे.