मुंबई : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. ही यात्रा इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमधल्या एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र ठेवण्यात आले होते. इंदूर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हे पत्र ठेवणाऱ्याचा शोध घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जुनी इंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात राहुल गांधी यांना धमकी देणारं पत्र ठेवण्यात आलं होतं. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. साधारण २४ नोव्हेंबरला राहुल गांधी इंदूरच्या खालसा स्टेडियममध्ये रात्री विश्रांती घेतील. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रकार खोडसाळपणाचा असू शकतो. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
अकोला जिल्ह्यात राहुल गांधींनी भाषण दिलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली. राहुल गांधींनी असा दावा केला होता की, सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वतःवर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते हे सांगितले. ते म्हणाले, “ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे.” असं वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींवर टीका होतेय.
२० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रा
देशात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे. त्यात राहुल गांधी सहभागी झाले आहेत. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात असून, २० नोव्हेंबर रोजी ही यात्रा मध्य प्रदेशात पोहोचेल.