अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील जळोदकडून अमळनेर शहराकडे येणाऱ्या चारकीतून नेत असलेला ५३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. यासह चारचाकी, मोटरसायकल व मोबाईल असा सुमारे १२ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केल्याची घटना दि १८ रोजीच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास जळोद रोडवर घडली.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे १७ नोव्हेंबरच्या रात्री गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. जळोद– अमळनेर रस्त्यावरून एक चारचाकीमध्ये गांजा विक्रीसाठी अमळनेर शहरात आणला जात आहे. हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव यांना माहिती देऊन हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, मिलिंद भामरे, दीपक माळी, रवींद्र पाटील, सूर्यकांत साळुंखे, चालक सुनील पाटील यांना घेऊन जळोद रस्त्यावर विजयनाना कृषी महाविद्यालयाजवळ सापळा लावला.
काही वेळानंतर मध्यरात्रीनंतर १८ नोव्हेंबरच्या पहाटे १ वाजेच्या सुमारास एक पांढरी कार आणि त्याच्या पुढे मोटरसायकल येताना दिसली. यामुळे पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी यंत्रणा सतर्क करताच कार चालक आणि मोटरसायकल चालक यांनी वाहने वळवून उलट्या दिशेने पळू लागले. पोलिसांनी देखील लागलीच वाहनात बसून त्यांचा पाठलाग सुरू केला. बचावासाठी आरोपीनी आपली वाहने नन्दगाव रस्त्याला वळवली. आरोपीना आपण पोलिसांच्या तावडीत सापडू याची जाणीव झाल्याने त्यांनी चारचाकी खड्ड्यात टाकली आणि तेथून उतरून पळ काढला. याबाबत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी लाईव्ह महाराष्ट्रशी बोलताना माहिती दिली.