मुंबई वृत्तसंस्था ;- संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत काल राज्यात एकाच दिवसात 15 लाखांपेक्षा अधिक लस मात्रा देत लसीकरणाचा नवा विक्रम महाराष्ट्राने नोंदवला आहे. बुधवारी रोजी दिवसभरात 15 लाख 3 हजार 959 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
राज्यात लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या 6 कोटी 55 लाखांवर गेली आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे.
राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला असून आरोग्य विभागाची यंत्रणा लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर परिश्रम घेऊन लसीकरणाचे नवे विक्रम करत आहे. 21 ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी 11 लाख 4 हजार 465, तर 4 सप्टेंबर रोजी 12 लाख 27 हजार 224 नागरिकांचे लसीकरण झाले त्यानंतर 12 लाख लसीकरणाचा विक्रम मोडून काढत बुधवारी 15 लाख 3 हजार 959 लसींची मात्रा एका दिवसात देण्याची किमया आरोग्य विभागाच्या यंत्रणेने करून दाखवली आहे. लसीकरण कार्यक्रमातील हे आजपर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटक यासाठी परिश्रम घेत आहेत, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.