जळगाव : प्रतिनिधी
येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात महिलेच्या गर्भाशयावरील अत्यंत गुंतागुंतीची आणि जिकिरीची शस्त्रक्रिया येथील डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे शहरातील इतर खासगी रुग्णालय व जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी असमर्थता दाखवली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रवंजे (ता. एरंडोल) येथील ४८ वर्षीय महिलेला दीड वर्षांपासून पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यावेळी त्यांनी तात्पुरता उपचार करून घेतला. मात्र आता त्यांना त्रास असह्य होऊ लागल्याने त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केली. गर्भाशयाची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारासाठी त्यांना औरंगाबाद जाण्याचा सल्ला दिला. नंतर त्यांच्या नातेवाईकांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात महिलेला दाखविले. परंतु महिलेच्या जीवाला धोका असल्याने या रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थता दाखवली. या सर्व प्रकारानंतर महिला वाचणार नाही, अशी त्यांच्या नातेवाईकांची खात्री पटली होती.
अशातच त्यांनी देवकर रुग्णालयाशी संपर्क साधला. येथील डॉक्टरांनी आधी महिलेची सोनोग्राफी व सिटीस्कॅन करून गर्भाशयाची शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असल्याचा निष्कर्ष काढला. परंतु रुग्णालयात उपलब्ध प्रशस्त आय सी यु व २४ तास ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या सुविधेमुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचा निर्णय घेतला. सर्व तपासण्यानंतर स्रीरोग तज्ञ डॉ. शाहिद खान व त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आणि रुग्णाच्या नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
माझ्या बहिणीचा नवा जन्म
रुग्ण महिलेसोबत विविध दवाखाने फिरलेल्या खेडी – आव्हाने येथील त्यांच्या बहिणीने सांगितले की, खासगी रुग्णालय व सिव्हील हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी माझ्या बहिणीच्या जीवाला धोका असल्याचे सांगून उपचारास नकार दिला. त्यावेळी आमच्या सर्व आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. मात्र देवकर रुग्णालयात डॉक्टरांच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करून माझ्या बहिणीला नवा जन्म दिला. एवढेच नाही तर अत्यंत कमी दरात माझ्या बहिणीची शस्त्रक्रिया देवकर रुग्णालयाने केली. त्याबद्दल देवकर रुग्णालयातील डॉक्टरांची सेवाभावी टीम व आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू. रुग्णालयातील अत्यंत प्रशस्त सुविधा आणि स्वच्छता पाहून आम्ही भारावून गेलो. माझ्या बहिणीला काही दिवस आयसीयूमध्ये ठेवून पूर्णपणे बरी झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. यापुढे आरोग्याची काहीही समस्या असल्यास थेट देवकर रुग्णालय गाठायचे, असा निर्णय आमच्या सर्व नातेवाईकांनी घेतला आहे.