मुंबई : वृत्तसंस्था
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना काही सूट देण्यात आल्या होत्या. यामध्ये शाळा तिथं परीक्षा केंद्र, वाढीव वेळ, अभ्यासक्रमामधील कपात याचा समावेश होता. मात्र, यंदा या सवलती रद्द करण्यात येणार आहेत.
दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण मंडळाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा जुन्या पद्धतीनंच घेतल्या जाणार आहेत, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्यानं या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. यंदाची परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल, तर राज्य मंडळाच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, परीक्षेच्या दरम्यान अतिरिक्त वेळही दिला जाणार नाही, असा निर्णयही शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे.