जळगाव : प्रतिनिधी
जळगाव वाहन क्षेत्रातील व्यावसायिक किरण बच्छाव यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांचा जिल्हापेठ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्या आधारावर दरोडेखोरांच्या शोधार्थ जिल्ह्यात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
सोमवारी रात्री ९ वाजता अजय कॉलनीतील रहिवासी किरण बच्छाव यांच्या घरात सहा ते सात दरोडेखोरांनी बळजबरीने प्रवेश केला. त्यानंतर बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून बच्छाव दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्न केला; मात्र आरडा-ओरड झाल्यानंतर दरोडेखोरांनी बच्छाव यांच्या पत्नी वेदांती यांचा ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांना घराच्या काही अंतरावर वेदांती बच्छाव यांचा मोबाईल मिळून आला तर सत्यवल्लभ हॉलजवळ मिरचीपूड व हातोडी असलेली बॅग मिळून आली होती. रात्री उशिराने किरण बच्छाव यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरोडेखोरांच्या शोधार्थ शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांचे पथक मंगळवारी पाठविण्यात आले होते. पोलिसांच्या हाती दरोडेखोरांचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरोडेखोर कुठल्या दिशेने गेले, त्यांचा धागादोरा मिळावा म्हणून रात्रीच पोलिसांनी अजय कॉलनीतील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे केंद झालेले आहेत. तोंडाला रुमाल.. डोक्यावर टोपी घातलेले दरोडेखोर सीसीटीव्हीत दिसून आले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले आहे. रात्री २ ते ३ वाजेपर्यंत दरोडेखोरांचा शहरात शोध सुरु होता.