अमळनेर : प्रतिनिधी
सुरतहून बिहारकडे निघालेल्या महिलेस अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या आणि धावत्या गाडीत प्रसूती झाली. सुपरफास्ट एक्स्प्रेस थांबवून तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.
क्रांतीदेवी (२८) असे या महिलेचे नाव आहे. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. सुरतहून बरौनी सुपरफास्ट रेल्वेने आपल्या तीन मुलींसोबत बिहारकडे ती निघाली होती. शिंदखेडा – अमळनेरदरम्यान तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. रेल्वे अमळनेर स्थानकावर थांबत नाही. जळगाव किंवा भुसावळ जाईपर्यंत खूप उशीर होणार होता. महिलेसोबत कोणीही पुरुष नव्हते फक्त तिच्या तीन मुली सोबत होत्या. अमळनेर स्टेशनवरून गाडी पास होत असतानाच महिलेची डब्यातच प्रसूती झाली. तातडीने रेल्वे गार्ड, आरपीएफ यांच्या मदतीने सुपरफास्ट रेल्वे अमळनेर स्थानकावर थांबवण्यात आली. स्टेशन मास्तर गणेश पाटील यांनी डॉ. किरण बडगुजर, बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद बाविस्कर यांना रेल्वेस्थानकावर बोलावून घेतले. डॉ. बाविस्कर यांनी वैद्यकीय सोपस्कार पूर्ण केले. महिला व बाळाची तपासणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. आई व बाळाची प्रकृती उत्तम आहे. महिलेचा पती सुरत येथे आहे. त्याला ही घटना कळविण्यात आली. याकामी वरिष्ठ फार्मसिस्ट किरण शिंदे, ड्रेसर रजनिशकुमार, आरपीएफ निरीक्षक कुमार श्रीकेश, जयपाल सिंग, दिनेश मांडळकर, कर्मचारी रउफ, अन्वर, हेल्थ युनिट टीम यांचे सहकार्य केले.